कोकणातल्या आंब्याची लहर आली म्हणून चौकशीसाठी बाहेर पडलो, रोजच्या ओळखीच्याच एक-दोन जणांना विचारलं, तर यांनी सरळ वर हात केले, मला वाटलं खरच नसतील बिचार्यांकडे, म्हणून मीही जास्त जबरदस्ती केली नाही, मात्र एकटा ओळखीचा जवळ येऊन म्हणालाच, "तुम्ही नक्की घेणार की फक्त चौकशी करताय?" त्यावर मला समजलं की 'गड्याकडे ब्लॅकसेल सुरुय'. मग मीही जरा मागणी वाढवून 2 पेट्या मागितल्या, त्यावेळेस समोरच्याला खरं वाटलं की मी आंबे खरेदी करण्यासाठीच आलोय, नंतर आंबे घेता घेता सगळं पितळ काढून घ्यायचा प्रयत्न सुरू केला, तेव्हा समजलं की या दिवसातही आंब्यांची मोठी उलाढाल सुरुय.
आता तुम्हाला वाटलं असेल की या संपूर्ण लॉकडाऊनमध्ये आंब्यांच्या सिजनवर मोठा परिणाम झाला असेल, मात्र असं काहीही नाहीये, कारण ज्यावेळी आम्ही आंबे विकणाऱ्या दुकानदारांसोबत बोललो, त्यावेळेस आम्हीच शांत झालो. कारण त्यांचं म्हणणं होतं की गेल्या काही वर्षांत जितका आमचा धंदा झाला नाही तेवढा धंदा यावर्षी होत आहे.
आंबे विक्रेते काय म्हणतात...
आम्ही दरवर्षी आमची रोजची कामं सोडून फक्त आंबे विकत असतो. आमची गावाकडे मोठी बाग आहे, त्यामुळे आम्हाला बाहेरून खरेदी करण्याची गरज नाही, मात्र आताच्या लॉकडाऊनमुळे तिकडचा माल मुंबईत आणणे जरा मुश्किलच आहे. आम्हाला वाटत नाही की आमचं नुकसान होतय, कारण गेल्या वर्षीपेक्षा यावर्षी आमच्याकडे आंब्याची मागणी वाढली आहे. आम्हीही ती मागणी पूर्ण करण्याचा प्रयत्न करतोय. आम्हाला दिवसातून रोज 200 ते 300 फोन येतात, आम्ही त्यांना उद्या या असं सांगतो, दुसऱ्या दिवशी सकाळी 5 ते 8 वाजेपर्यंतचा वेळ देतो. त्याच वेळेत आमची गावाकडून आंबे घेऊन गाडी येते, तोपर्यंत इकडे गिऱ्हाईकांची रांग लागलेली असते आणि रांग लावून फक्त 'एक व्यक्ती एक डझन' अशापध्दतीने आंबे देतो.
आंब्याची मागणी का वाढली?
संपूर्ण ठिकाणी लॉकडाऊन आहे, सगळेच जण घरात आहेत, जे आंब्याच्या सिझनमध्ये व्यस्त असायचे, तेही आता मोकळे आहेत. हीच आंबे शौकिनांसाठी सुवर्णसंधी आहे, मात्र मुंबईत आंबाच येत नसल्याने या शौकिनांची अडचण झालीये, त्यातच असे कुठेतरी आंबे मिळू लागले की अशा शौकिनांचे स्वप्न सत्यात उतरते आणि मागणी वाढते. एकतर मुंबईत कोणालाच माहीत नाहीये की या घडीला आंब्याची विक्री कुठे सुरु आहे, त्यामुळे जिथे मिळेल तिथून जास्तीत जास्त मागणी घरी राहणारे अनेक लोक करू लागले, कारण आता मुंबईकरांसाठी आंबा सोडला तर दुसरं कोणतंच सिझनेबल फळ त्यांच्या घरापर्यंत पोहोचत नाहीये.
कांदा विक्रेतेही आंबे विकण्यासाठी तयार आहेत...
भाजी विक्रेत्यांना विक्रीसाठी सुट दिली आहे, मात्र अपुरा आलेला माल यामुळे ते लोकही व्यवस्थित आणि गरजेपुरताही धंदा करू शकत नाहीयेत, त्यामुळे त्यांचीही आंबे विक्री धारकांकडे मागणी आहे. आमच्याकडे भाजीचा पुरवठा नसल्याने आम्ही आंब्याचीही विक्री करू आणि त्यातून काही पैसे कमावण्याचा प्रयत्न करू, असं काहींच म्हणणं आहे.
आंब्यांचा तसा जीवनावश्यक वस्तूंमध्ये समावेश होत नाही, तरीही त्याच्या विक्रीला सरकारने होकार दर्शवला आहे, मात्र लॉकडाऊन असल्याने स्थानिक पातळीवर पोलिसांकडून अजून याबाबत परवानगी मिळाली नाही, त्यामुळे आंब्यांची विक्री करणारे अनेक व्यापारी आता घरगुती किरकोळ विक्री करत आहेत. या सगळ्यात लॉकडाऊनचं उल्लंघन होणार नाही याचीदेखील ते काळजी घेत आहेत.
आजपर्यंत संपूर्ण कोकणात फक्त 40 टक्के आंबा पिकला असल्याचं कोकण वासियांच म्हणणं आहे, त्यातच आलेला लॉकडाऊनमुळे आंबा कुजून चालला आहे, त्यामुळे पोलीस प्रशासनाकडून परवानगी घेऊन तोच आंबा गुजरातला पाठवण्याची सोय काही प्रमाणात केली जात असल्याचेही एका रत्नागिरीच्या व्यापाराने सांगितलं.
हा लेख तुम्हाला कसा वाटला, हे कमेंटमध्ये नक्की कळवा आणि आमच्या सोशल हँडलला फॉलो करायला विसरू नका.


1 Comments
कामाच्या माहिती आणि लेख पण तितकाच छान. धन्यवाद
ReplyDelete