लाखो करोडो मुंबईकरांसाठी लॉकडाऊन हा खूप मोठा अपघात म्हणूनच समोर आलाय. वाऱ्यासारखी बेभान धावणारी मुंबई स्टॉपवॉच सारखी स्टॉप करण्यात आली आणि जीवपेक्षा प्यारी असणारी मुंबापुरी मुंबईकरांच्या जीवसाठी थांबली.

आज वंटास मुंबई आपल्या वाचकांसमोर एक भयाण वास्तव घेऊन आली आहे. रहदारीच्या आणि गर्दीच्या या मुंबईत आपला विचार जिथे संपतो, तेथून मुंबईची लोकसंख्या चालू होते. ह्यातच कोरोना विषाणू काय मुंबईला सोडायचे नाव घेत नाहीये. कोरोना तर पाहुणा आहे, त्याला मुंबईकर हाकलून लावतीलच; पण आर्थिक संकट, त्यात बेरोजगारीचा मोठा प्रश्न; हा कसा सुटेल हे पाहणे जास्त महत्वाचे आहे. आज आपण मुंबईच्या क्षेत्रफळासोबत लोकसंख्या किती, त्यातील बेरोजगार मुंबईकर किती ह्याचा आढावा घेणार आहोत. 

मुंबईची लोकसंख्येने झालेली तुंबई
मुंबई ही भारताची आर्थिक आणि महाराष्ट्राची मुख्य राजधानी. त्यातल्या त्यात भारतातील सर्वाधीक लोकसंख्या असलेले शहर म्हणूनदेखील याच मुंबईला नावाजलं जातं. इतकेच नाही तर, मुंबई ही जगातील चौथे जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे, हेही या कोरोनाच्या महासंकटात विसरून चालणार नाही. आता यावरूनच आपण विचार करू शकतो की मुंबईत किती लोकांची झुंबड असेल. आपल्या भारताची लोकसंख्या 13 कोटींच्या घरात आहे आणि यातील जवळपास 2 कोटीहून अधीक लोक एकट्या मुंबईत राहतात. मुंबईची परिस्थिती अशी आहे की खायला ताटं दहा आणि खाणारे शंभर! 

दाट लोकवस्ती असणाऱ्या मुंबई शहरात लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. मुख्य म्हणजे लोकसंख्येला आळा बसेल, असे कोणतेही निर्बंध नसल्यामुळे मुंबई सगळ्यांची ड्रीम सिटी बनली आहे. आता मुंबईचे एकूण क्षेत्रफळ 603.4 चौरस किमी म्हणजेच 233 चौरस मैल आहे. हेच जर लोकसंख्येच्या दृष्टीने विचार केल्यास इथली घनता अंदाजे 73,000 प्रति चौरस मैल आहे, जी मुंबईला जगातील सर्वात दाट लोकवस्तीचे शहर बनवते. 

मुंबईत राहणाऱ्या प्रत्येक गरिबाला स्वतःचं हक्काचं एक घर आणि नोकरी असावी असं वाटतं पण; प्रत्येकाला ते मिळवता येत नाही, हेही इथलं भयान सत्य आहे. 2 कोटीहून अधीक लोकसंख्या असलेल्या मुंबईत प्रत्येकजण स्वतःच्या पोटासाठी काही ना काहीतरी करतच असतो, मात्र हे चित्र आजच्या कोरोनाच्या महासंकटात वेगळं आहे. 

बेरोजगारीच्या दुष्काळात कोरोनाचा तेरावा महिना
तसं पाहिलं तर आज वर्क फ्रॉम होम करणारे सोडले तर मुंबईतील सगळी जनता बेरोजगार बनली आहे. त्यात 1 कोटींच्या आसपास लोक कोरोनामुळे काम सोडून घरी बसल्याची माहिती आहे. हा आकडा आणखी वाढण्याची भीती आहे. छोट-मोठे उदयोग असो, वा व्यवसाय सगळ्यांना कोरोनाने टाळा लावला. मुंबई अनेक वर्षांपासून बेरोजगारीशी दोन हात करत असताना कोरोना विषाणूने त्यात भर घातली. तोंडचा घास पळवणाऱ्या या कोरोना विषाणूने अनेकांचे काम हिरावून घेतले. घरी बसलेला माणूस आज आपल्या कामाची शाश्वती देऊ शकत नाही. मुंबईत लोकसंख्येचा रेषो जितका उंचावतो, तितकाच कामाचा रेषो खालावतोय. लॉकडाऊनमुळे कामगार घराबाहेर जाऊ शकत नाहीत. आज वर्क फ्रॉम होम करणाऱ्यांची संख्या देखील कमी आहे. यात आर्थिक संकट कसे दूर होईल? बेरोजगारी कशी दूर केली जाईल? आणि लवकरात लवकर प्रोग्रेस कशी होईल? हे सरकार पुढे मोठे आव्हान आहे.

सरकारची जबाबदारी
सरकारने मुंबईतल्या अनेकांची कामे जाणार नाहीत, ह्याची दक्षता घेतली पाहिजे. जेणेकरून मुंबईकर आपले घर निचिंत चालवू शकतील. निश्चितच पैशांचे मोठे संकट उभे आहे, आर्थिक तोल सावरणे गरजेचे आहे; ह्यात सरकारने अनेक बेरोजगारांना लवकर कामावर लावून कमी वेळेत आर्थिक तोलमोल सावरून घेतला पाहिजे. व्यवसायात नुकसान झालेल्यांना नुकसान भरपाई द्यावी अथवा कामाला धरून तोडगा काढावा.

तरुणांची जबाबदारी
मुंबईतील असे अनेक स्थानिक तरुण आहेत, कदाचित लॉकडाऊनचा त्यांच्यावर कोणताच परिणाम झालेल्या पाहायला मिळत नाही. कारण लॉकडाऊनच्या आधी आणि लॉकडाऊनच्या नंतरही अशा तरुणांना खर्चासाठी पैसे हे घरातूनच मिळत असतात. याच्यात असा एक तरुण वर्ग आहे जो काही काळ कमवतो आणि मोठा काळ खर्च करतो. इथल्या अनेक तरुणांना सेव्हिंगपेक्षा रोजची मौजमजा अपेक्षित असते. आज अशा तरुणांनी पुढे येऊन घरातल्या पैशांचा, इथल्या सेव्हिंगचा आणि जे मिळेल ते काम करण्याचा विचार केला पाहिजे. लॉकडाऊनच्या काळात जरी कोणतं घरात बसून काम करण्याची संधी त्यांना मिळत असेल, तर ती संधी न सोडता कामाला लागलं पाहिजे. फक्त एवढं लक्षात ठेवा की घरात येणारा एक रुपयादेखील खूप महत्वाचा असणार आहे, बाकी इतर कळतं पण वळत नाही, अशी काहींची परिस्थिती होईल, पण त्याकडे थोडं दुर्लक्ष कराचं.