भारतातील नागरिक हे आपल्या उदरनिर्वाहासाठी कोणत्याही शहरात जाऊन स्थलांतरित होतात. त्यापैकीच सर्वात जास्त लोक हे मुंबईत येऊन आपला संसार थाटण्याचा प्रयत्न करत असतात. हे प्रयत्न करत असताना अनेक संकटांना त्यांना सामोरं जावं लागतं आणि या संकटांनापासून शिकवणही मिळते.
मुंबईत येणारे सर्वात जास्त नागरिक हे झोपडपट्टी भागात राहात आहेत. 2011 च्या जनगनेनुसार मुंबईतील 42 टक्के लोक हे झोपडपट्टीत राहतात. याचे सर्वाधिक प्रमाण हे मुंबईतील धारावीत आहे.
आशिया खंडातील सर्वात मोठी झोपडपट्टी म्हणजे धारावी जिची मुंबईतील मिनी इंडिया म्हणून ओळख आहेच, सोबतच मुंबईला लागणाऱ्या छोट्यामोठ्या वस्तूंचे उत्पादन करणारा कारखाना आणि आता नव्याने धारावीची ओळख आहे ती म्हणजे मुंबईतील कोरोनाचा महाहॉटस्पॉट. 1971 साली धारावीला झोपडपट्टी म्हणून मान्यता मिळाली तेव्हा येथील लोकसंख्या अवघी दीड लाख होती.
धारावीत कोरोनाचे रुग्ण जसे वाढत गेले, तसे अनेक प्रयोगदेकील करण्यात आले. क्वांरंटाईन करण्यात आलं, हायड्रोक्सिक्लोरोक्विन औषधाची चाचणी देखील घेण्यात आली. तसेच दारोदार जाऊन महापालिकेने मास्क वापरणं, स्वछता या विषयीची जनजागृतीदेखील केली. हे एका बाजूला असलं तरी मुळात प्रश्न असा पडतो की या दाट वस्तीत कोरोना पसरण्याचं कारण फक्त इथलं सोशल डिस्टंसिग आहे का?
या प्रश्नाचे उत्तर शोधताना तिथल्या दाट लोकवस्तीसोबतच, तिथल्या सामाजिक व आर्थिक जडणघडणीला जबाबदार ठरवावं लागेल. धारावीत जवळपास 78 हजारापेक्षा अधिक झोपडपट्ट्या आहेत आणि यामध्ये 15 लाखापेक्षा अधिक लोक राहतात. वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम या संस्थेच्या अहवालानुसार धारावीत दरवर्षी 1 अब्ज डॉलरची उलाढाल होते कारण येथुन अनेक छोटे मोठे व्यवसाय चालत असतात.
मुख्यतः धारावीची वस्ती मुंबईत अगदी मोक्याच्या ठिकाणी आहे. कारण धारावीच्या पश्चिमेकडे माहीम स्टेशन आहे, पूर्वेकडे सायन स्टेशन आहे आणि उत्तरेकडे मिठी नदी आहे. या तिन्हीच्या अगदी कचाट्यात धारावीची लोकवस्ती वसलेली आहे. आपण ज्याला झोपडपट्टी म्हणून ओळखतो, हे अगदी ब्रिटिशांच्या काळापासून नावारूपाला आलेलं आहे.
तटबंदीच्या कारणास्तव जो रेवा किल्ला बांधला होता, तो काळा किल्ला म्हणून ओळखला जातो, त्या नावाचं बस स्थानक आजदेखील धारावीत आहे. धारावीची कहाणी ही स्थलांतरीतांची कहाणी आहे. 19 व्या शतकातील ब्रिटिश गॅझेटमध्ये ज्या सहा कोळीवाड्यांचा उल्लेख आहे, त्यापैकी एक धारावीचा कोळीवाडा म्हणून नोंद आहे, म्हणजे धारावीचे पुर्वज कोण, असा प्रश्न विचारल्यास त्याचं उत्तर 'कोळी लोक' असच येतं.
1884 साली ब्रिटिशांनी चामड्याचे व्यवसाय धारावीत आणले, त्यामुळे चामड्याशी संबंधित असलेले काही लोक धारावीत येऊ लागले. तामिळनाडू राज्यातून सुमारे 25 हजार लोक वस्तीत आले होते. महाराष्ट्राप्रमाणे, आंध्रप्रदेश,कर्नाटक, गुजरात, राज्यस्थान, उत्तरप्रदेश, काहीप्रमाणात दिल्ली अशा इतर राज्यातून लोक धारावीत स्थलांतरित झाले.
चामड्याच्या वस्तू मोठ्या प्रमाणात येथे बनू लागल्या आणि ही वस्ती व्यवसायाच्या दृष्टीने आकार घेऊ लागली. नायलॉनच्या वस्तू, कुंभार काम, कापडी काम, रेडिमेड शर्ट बनवणारे व्यवसाय येथे आकार घेऊ लागले. मुंबईतील देवनार डम्पिंग ग्राऊंडच्या अगोदर धारावी येथे डम्पिंग ग्राउंड होते, त्यामुळे छोटे प्लास्टिक विकून भंगार तयार करण्याचे काम येथे सुरू झाले. प्लास्टिकमध्ये कोणते रसायने असतात, याबद्दल काहीही तेथील लोकांना माहीत नव्हते म्हणून येथे अनेक आरोग्याच्या समस्या उद्भवू लागल्या.
2005 साली मिठी नदीच्या पुरानंतर येथे साथीच्या रोगांनी थैमान घातले होते. 1981 साली राजीव गांधी यांनी धारावीच्या विकासासाठी आराखडा तयार केला व 1984 साली धारावीच्या विकासासाठी 100 कोटी रुपये मंजूर केले. तेव्हापासून अनेक विकास आराखडे आले आणि गेले परंतु धारावीचा विकास काही झाला नाही. मोठं मोठ्या इमारती उभ्या राहिल्या, अल्प प्रमाणात उपलब्ध विकास होऊ लागला परंतु धारावीत एकूणच पायाभूत सुविधांचा अभाव आहे. यामुळेच कोरोनाचा महाहॉटस्पॉट ही धारावी ठरली असावी.
धारावी पुनर्विकास समितीसोबत काम करणारे ऍड. राजेंद्र कोरडे म्हणतात की धारावीत याआधी सुविधा आणि भौगोलिकदृष्ट्या विकास झाला असता आणि नियोजनबद्ध धारावी उभी राहिली असती तर कोरोनाचा प्रसार रोखण प्रशासनाला सोपं गेलं असत.
गेल्या 46 वर्षात धारावीची पुनर्विकासाची प्रक्रिया अधिक गुंतागुंतीची होत गेली. धारावीला आतापर्यंत तीन बलाढ्य धक्के बसले, एक 1993 ची हिंदू-मुस्लिम दंगल, 2005 चा मुंबईतील महापूर आणि 2016 ची मोदी सरकारची नोटाबंदी, पण हे सर्व धक्के पचवत धारावी सुरूच राहिली. त्याचप्रकारे कोरोनाचा हॉटस्पॉट ठरलेली धारावी कोरोनावर मात करून पुन्हा त्याच डौलाने उभी राहील यात शंका नाही.
कोरोना हा काही दिवसांचा प्रश्न नाही, कोरणामुळे काही तातडीचे आणि काही दुरोगामी विचार करण्याची गरज ही प्रशासनाला आहे. नाहीतर भविष्यात अनेक भीषण परिस्थितीचा सामना तेथील नागरिकांना करावा लागेल. हा लेख तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये आम्हाला जरुर कळवा, याव्यतिरिक्त कोणत्या विषयाची माहिती पाहिजे असेल, तर तेही कळवा, ती माहिती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा नक्की प्रयत्न करू.


0 Comments