कोरोना आजारावर तुर्तास ठोस औषध मिळाले नसून संशोधकांचे यावर संशोधन सुरू आहे. तात्पुरता उपाय म्हणून डॉक्टर उपचारासाठी हायड्रॉक्सिक्लोरोक्विन या औषधाचा वापर करत आहेत, त्याने अनेक रुग्ण बरेदेखील झाले आहेत. नुकतेच आपण ऐकले असाल, कोरोनातून बऱ्या झालेल्या रुग्णांमधील प्लाझ्माचा वापर करून इतर कोरोना रुग्णांवर उपचार केला जाणार आहे, त्यामुळे कोरोना संक्रमित रुग्ण बरे होऊ शकतात; असा दावा अनेक डॉक्टरांनी केला आहे. हे कसं शक्य आहे, त्यामुळे रुग्ण आणखी आजारी पडू शकतो की बरा होऊ शकतो, नक्की ही प्लाझ्मा थेरपी आहे तरी काय? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे वंटास मुंबई तुमच्यासाठी घेऊन आलीये.

काय आहे प्लाझ्मा थेरपी?
कोरोना विषाणूला हरवून बरी झालेली व्यक्ती काही अटीशर्ती पूर्ण करत आणखी कोरोना रुग्णांचे जीव वाचविण्यासाठी रक्तदान करू शकते. आपल्या रक्तामध्ये एक 'पिवळसर लिक्विड' घटक असते, त्याला प्लाझ्मा म्हणतात. प्लाझ्मा रक्ताच्या पेशी निलंबनात ठेवतो. तसेच प्लाझ्मा हा रक्ताचा द्रव भाग आहे ज्यामुळे आपल्या शरीरात पेशी आणि प्रथिने असतात. हेच प्लाझ्मा रक्तदान करणाऱ्या व्यक्तीच्या रक्तातुन काढून, कोरोना बाधित रुग्णाच्या शरीरात टाकला जाणार, यास प्लाझ्मा थेरपी असे म्हणतात.

प्लाझ्मा थेरपीचा इतिहास खूप मोठा आहे
संसर्गजन्य रोगांवर उपचार म्हणून अनेक दशकांपासून प्लाझ्मा थेरपीचा वापर केला जात आहे. सार्स, मर्स, H1N1 असो वा पहिल्या महायुद्धात 1918 मध्ये पसरलेल्या स्पॅनिश फ्लू या सर्व साथीच्या आजारांची सुटका ही प्लाझ्मा थेरपीचा वापर करून झाली होती. इतकेच नव्हे तर इबोलासारख्या आजाराचा संसर्ग झालेल्या रुग्णांकरता प्लाझ्मा थेरपीचा वापर करण्यात आला होता.

प्लाझ्मा कसे काम करतो?
एखादा विषाणूने शरीरात शिरकाव केला तर आपले शरीर त्याला हुसकावून लावण्यासाठी जोरदार प्रयत्न करतं. विषाणू आणि आपल्या शरीरासोबत होणाऱ्या  लढाईत आपले सैनिक असतात ते म्हणजे अँटिबॉडीज. एका विशिष्ट विषाणूला मारण्यासाठी आपलं शरीर विशिष्ट प्रकारच्या अँटीबॉडीज तयार करतं. या महत्वाच्या अँटीबॉडीज आपल्या रक्तातल्या प्लाझ्मामध्ये असतात. कोरोनामधून बऱ्या झालेल्या व्यक्तीच्या शरीरात कोरोनाशी लढू शकणाऱ्या अँटीबॉडीज मुबलक असतात. त्या काढून कोरोनाशी लढणाऱ्या एखाद्या व्यक्तीच्या शरीरात सोडल्या, तर मग त्या व्यक्तीचं शरीर कोरोनाशी चांगल्या पद्धतीनं दोन हात करू शकतं.

कोण करू शकतात प्लाझ्मादान, काय आहेत अटीशर्ती?
◆  मुख्य म्हणजे प्लाझ्मा दान करणारा व्यक्ती कोरोना लढा जिंकलेला असावा.
◆ कोरोनातून मुक्त झाल्याच्या 14 दिवसानंतर तो व्यक्ती स्वइच्छेने त्याच रक्त दान करू शकतो.
◆ प्लाझ्मा देणाऱ्या व्यक्तीची गेले 3 महिने कोणतीही परदेश प्रवासाची हिस्टरी नसावी.
◆ प्लाझ्मा देणाऱ्या व्यक्तीला ताप अथवा श्वसनाशी संबंधित विकार असू नयेत.
◆ प्लाझ्मा देणाऱ्या व्यक्तीचे शेवटचे दोन्ही कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह येणे महत्त्वाचे आहे.

प्लाझ्मा थेरपीवर काय आहे डॉक्टरांची प्रतिक्रिया?
प्लाझ्मा थेरपीला घेऊन आम्ही पोद्दार रुग्णालयातील मायक्रोबायोलॉजिस्ट डॉ. राजीश शाह यांच्याशी संपर्क साधला, त्यावेळेला त्यांनी दिलेली माहितीही अत्यंत महत्वाची वाटली. प्लाझ्मा थेरपीमुळे कोरोना संक्रमित रुग्ण ठणठणीत बरे होण्याची शक्यता WHO नेदेखील वर्तवली आहे. सोबतच केंद्र सरकारनेदेखील ही चाचणी करण्याची परवानगी दिली आहे, मात्र यात काही मुख्य अटी आहेत, ज्यांची खबरदारी घेणे खूप गरजेचे असते, अनेकवेळा ज्या रुग्णांचा प्लाझ्मा घेतला जाणार आहे, वर दिलेल्या माहितीनुसार त्यांची बॅकराऊंड हिस्ट्री तपासली जाईल आणि पुढची प्रक्रिया केली जाईल. मात्र या सगळ्यात मोठं आव्हान असणार आहे, ते म्हणजे कोरोनातून मुक्त झालेल्या रुग्णांना रक्तदान करण्यासाठी प्रोत्साहित करणं. अनेक रुग्ण घाबरलेले आहेत, ते कोणाच्याही संपर्कात येण्यास टाळाटाळ करत आहेत, त्यात त्यांच्या शरीरातुन प्लाझ्मा घेणे म्हणजे एखाद्या रुग्णाला मृत्यूच्या दारातून बाहेर काढण्या इतपत कठीण काम असणार आहे. 

अनेक ठिकाणी कोरोनातुन बरे झालेले पेशंट आपला प्लाझ्मा म्हणजेच रक्तदान करण्यासाठी तयार असतात, त्यामुळे मुंबईमध्ये सुरू केलेल्या या प्रक्रियेला बऱ्या झालेल्या रुग्णांचा कसा प्रतिसाद मिळतो, हे पाहाणे गरजेचे आहे, असे डॉ. राजीश शाह म्हणतात.
   
जगभरातील अनेक देशांमध्ये कोरोनावर उपचारासाठी या थेरपीचा वापर केला जातोय. प्लाझ्मा थेरपीसाठी परवानगी भारतात सगळ्यांत आधी केरळला मिळाली, आता महाराष्ट्रात लवकरच या थेरपीनुसार रुग्णनांवर उपचार केले जातील. रक्तदान करून प्लाझ्मा थेरपी करण्याची प्रोसेस मोठी आहे. त्याला लागणारा खर्च हा जळपास 2 ते 3 हजार रुपये आहे. या सगळ्याचा विचार झाला आहे आणि राज्यशासन कामाला लागलं आहे.