मुंबईची परिस्थिती चिंताजनक आहे, यात शंका नाहीच. कारण दिवसेंदिवस रुग्णांची वाढती संख्या, हे इथलं एकमेव कारण आहे, मात्र दोन दिवसांपूर्वी आलेल्या पाच सदस्यीय केंद्रीय पथकाने मांडलेल्या आकडेवारीत किती तथ्य आहे, हे समजून घेण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत.
काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रातील रुग्णांचा आढावा घेण्यासाठी केंद्राच्या आरोग्य मंत्रालयाकडून पाच जणांची टीम राज्यात दाखल झाली आणि मुख्यत्वे पुणे आणि मुंबई या दोन शहरांचा त्यांनी अभ्यास केला. प्रामुख्याने धारावीचा आढावा घेणे त्यांनी महत्वाचं समजलं. त्यांनी इथली परीस्थिती, लॉकडाऊनचा आढावा, रुग्णांचा आरोग्यतक्ता, अशा अनेक बाबींचा आढावा घेतला. मात्र त्यांनी एक रिपोर्ट सादर केला जो द हिंदू या वृत्तसंस्थेच्या हाती लागला आणि त्यांच्या माध्यमातून एक बातमी प्रसारित करण्यात आली. 30 एप्रिलपर्यंत 1 लाखांच्या आसपास रुग्णांची संख्या जाण्याची शक्यता आहे, तर 15 मेपर्यंत एकट्या मुंबईची संख्या 6 लाखांच्या घरात जाण्याची शक्यता आहे, अशी माहिती त्यांनी प्रसारित केली, यासोबतच संबंधित वृत्तात संपूर्ण आढावा मांडण्याचा त्यांनी प्रयत्न केलाय.
ही माहिती राज्यात / देशात पसरत असताना लगेचच महाराष्ट्र सरकारने एक परिपत्रक तथा सोशल मीडियावर एक मॅसेज व्हायरल केला. त्यामध्ये त्यांनी या आकडेवारीला घेऊन संपूर्णरित्या खुलासा करण्याचा प्रयत्न केला.
काय म्हणालं राज्यसरकार? (परिपत्रकातील मथळा)बृहन्मुंबई महानगरपालिका आणि राज्य सरकारद्वारे स्पष्ट खुलासा करण्यात आला की, सदर केंद्रीय चमूने आपल्या अभ्यास दौऱ्यादरम्यान माननिय महापालिका आयुक्त यांच्यासह पालिकेतील अतिवरिष्ठ अधिकाऱ्यांच्या भेटी घेतल्या. बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रातील परिस्थिती आणि त्या अनुषंगाने महापालिका करीत असलेल्या उपाययोजना याविषयीची माहिती घेतली. संबंधित केंद्रीय चमूने बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाद्वारे राबविण्यात येत असलेल्या विविध प्रतिबंधात्मक व वैद्यकीय उपाययोजनांबाबत समाधान व्यक्त केलेले आहे. त्याचबरोबर विविध माध्यमांमध्ये ज्या प्रकारची अतिरंजित माहिती प्रकाशित झाली आहे, तशा प्रकारचे कोणतेही प्रत्यक्ष वा सूचक वक्तव्य सदरहून चमूने महापालिका आयुक्तांकडे अथवा इतर कोणत्याही वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे केले नाही.
मुंबईची परिस्थिती...
सध्याच्या घडीला राज्यात जितकी रुग्णांची आकडेवारी आहे, त्याच्या 65 टक्के आकडेवारी ही एकट्या मुंबईत आहे, मुंबई परिसर म्हणजेच ठाणे-कल्याण, नवी मुंबई आणि वसई-विरार या क्षेत्रांचा आढावा यांचीही आकडेवारी पकडल्यास संपूर्ण महाराष्ट्रात 80 टक्के तर एकट्या मुंबईचीच आकडेवारी बनते, त्यामुळे इथे गंभीर वातावरण आहे, हे नक्की. मुंबईत 721 कंटेंनमेंट झोन घोषित केलेत, म्हणजे या संपूर्ण ठिकाणी डोअर टू डोअर जाऊन तपासणी केली जातेय आणि याच्यात संशयित कोणी आढळल्यास त्यांचे तात्काळ विलगिकरण केले जाते. अनेक ठिकाणं सील केलेत, अनेक इमारतीदेखी सील आहेत.
लॉकडाऊन असूनही रुग्ण का वाढत आहेत...
लॉकडाऊन असला तरी मुंबईतील 20 टक्के लोक कोणत्या ना कोणत्या कारणाने घराबाहेर पडत आहेत, त्यामुळे त्यांना याची लागण होत आहे. अशी माहिती बीबीसी मराठी वृत्तसंस्थेला राज्य सर्वेक्षण अधिकारी डॉ. प्रदीप अवटे यांनी माहिती दिली. आयसीएमआरच्या निकषानुसार नॉनसिम्प्टोमॅटिक रुग्णांची चाचणी करण्याची काहीही गरज नाही, मात्र ज्यांना ताप, सर्दी, खोकला असे आजार आहेत, त्यांची तातडीने तपासणी केली जात आहे.
या सगळ्यांवरून एक प्रश्न निर्माण होतोय की असे काही रुग्ण आता समोर येत आहेत, जे नॉनसिम्प्टोमॅटिक आहेत, ते जर रस्त्यावर फिरून अनेकांच्या संपर्कात आले तर काय परिस्थिती निर्माण होऊ शकते, याचा अभ्यास कदाचित प्रशासनाने केला नसेल, कारण मुंबईतल्या नॉनसिम्प्टोमॅटिक 53 पत्रकारांना कोरोनाची लागण झाल्याचं वृत्त समोर आलंय, त्यामुळे कोण कोरोनाचा रुग्ण आहे, हे कळणे मुश्किल आहे.


0 Comments