गेले काही दिवस मुंबईची लढाई कोरोनाच्या विरुध्द सुरू आहे. त्यामुळे सतत फायरिंग करणाऱ्या कोरोनापासून वाचण्यासाठी सगळ्या मुंबईकरांना घरी बसावं लागत आहे. आता दुसऱ्या कोणाचं निमुटपणे ऐकतील; ते मुंबईकर कसले? त्यामुळे जबरदस्तीने अनेक मुंबईकरांना घरी थांबवण्याची वेळ आलीये. त्यासाठी मुंबईतली 146 ठिकाणे सिल केली आहेत, म्हणजेच "ना कोई बाहर, ना कोई अंधर"! 

या सिल झालेल्या परिसरांमध्ये अजून एक प्रकार समोर आला आहे, तो म्हणजे हॉटस्पॉटचा. आता हॉटस्पॉट म्हणजे कुठल्या इंटरनेटसाठी नव्हे (मला माहिती आहे आता तुमचा पचका झाला असेल). पण हो! ही एक गंभीर गोष्ट आहे. ती म्हणजे अनेक वर्दळीच्या, स्लम ठिकाणी, जिथे मुंबईकर ऐकत नाहीत; तिथे हॉटस्पॉट एरिया म्हणून घोषित करून टाकलं आहे. "ना कोई बाहर, ना कोई अंधर" हा फॉर्म्युला इथेही लागू होतोच; मात्र त्याखेरीज या परिसरात डोअर टू डोअर म्हणजेच तिथे कितीही लोकसंख्या असली तरी प्रत्येकाचं कोरोना संदर्भातील चेकिंग होणारच.

या हॉटस्पॉटमध्ये कोणते परिसर येतात?
मुंबईतल्या वरळी कोळीवाडा, प्रभादेवी चाळ, कलीना येथील जांभळीपाडा, गोरेगाव येथील बिंबीसारनगर, कांदिवली येथील लोखंडवाला आणि घाटकोपर येथील निळकंठनगर अशा ठिकाणांचा समावेश आहे.

हॉटस्पॉट घोषित केल्यानंतर काय आहे इथली परिस्थिती?
घोषित केलेल्या परिसरामध्ये चारही बाजूने पोलीस बंधोबस्त तैनात करण्यात आला आहे. बाहेरचं कोणतच साहित्य, कोणतीच व्यक्ती आत जाऊ शकत नाही, की नाही आतलं कोणी बाहेर जाऊ शकतं? हे सहाही भाग संपुर्णरित्या वर्दळीचे असल्याने इथे सोशल डिस्टंसिग व्यवस्थितरित्या पाळलं जात नाही. त्यामुळे एका रुग्णाची लागण दुसऱ्याला होण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे फक्त लॉकडाऊन आणि सिल करून भागणारं नव्हतं, तर थेट हॉट-स्पॉट म्हणून घोषित करणे गरजेचे होते.

आता या हॉटस्पॉटच्या ठिकाणी असणाऱ्या सगळ्या नागरिकांचे फ्रीमध्ये चेकिंग केले जाणार आहे आणि काही प्रमाणात सिम्पटम्स आढळले तर त्यांना होम क्वारंटाईन सोबतच हॉस्पिटल कॉरंटाईन करून ठेवलं जाणार आहे.