मुंबईतली अनेक ठिकाणे आज एकदम सिल करण्यात आली आहेत. त्यामुळे तिथे असलेल्या अनेक पोलिसांना आपल्या घरी जाता येत नाहीये. अशीच एक दाहक कहाणी वरळी कोळीवाडा येथे तैनात करण्यात आलेल्या पोलीस बांधवांची झाली आहे.
वरळी कोळीवाड्यात कोव्हिड-19 चे रुग्ण सापडल्याने दादरची मोठी पोलीस फौज तिथे तैनात करण्यात आली. त्यासाठी दादर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक दिवाकर शेळके, पोलिस निरीक्षक सुनयना नाटे, सहाय्यक पोलिस निरीक्षक शिवाजी देवकर, यांच्यासोबत हवालदार जयेश घोडेराव आणि राहुल गाडेकर हे तिथे 24 तास आपली सेवा बजावत आहेत.
यावर मुंबई पोलिसांचे कायदा व सुव्यवस्थेचे सहआयुक्त विनय के चौबे म्हणतात “आमच्या समोर हा विषाणू कुठल्याही प्रकारे दुसरीकडे पसरू नये हे मोठं आव्हान होतं, त्यामुळे पोलीस पथकाने त्या भागाकडे जाणारे सर्व रस्ते सील करून चांगले काम केले.”
सगळे रस्ते बंद करण्यासाठी सुमारे 100 पोलीस तिथे तैनात करण्यात आले होते. बीएमसीच्या मदतीने बंदोबस्त लावण्यासाठी पोलिसांनी जनता कॉलनी, वाल्मिकी नगर, गोल्फदेवी मंदिर रस्ता आणि आदर्श नगर यांसारख्या असुरक्षित क्षेत्रांना पहिल्यांदा बंद करण्याचा निर्णय घेतला. या विभागात कोरोना रुग्णांची संख्या वाढल्याने इथे बाहेरचे कोणीही जाऊ नये, यासाठी आम्ही प्रयत्न करत होतो. कोळीवाड्यातून प्रभादेवीपर्यंत समुद्रकिनार्‍याचा वापर होऊ नये म्हणून पोलीस समुद्राकडे जाणाऱ्या रस्त्यांवर लक्ष ठेवून आहेत, अशी माहिती ”दादर पोलीस ठाण्याचे निरीक्षक सुनयना नाटे यांनी दिली.
मुंबईकरांच्या जिवासाठी मुंबई पोलीस आतोनात प्रयत्न करत आहेत, मात्र ज्यांच्या जीवासाठी हे लोक धडपडत आहेत, त्यांनाच कशाची काळजी नसल्याने मुंबई पोलीसांच्या डोक्यावरून पाणी जाण्याची वेळ आलीये, त्यामुळे कृपा करून स्वत:च्या जीवासाठी तरी घरातून बाहेर पडू नका, अशी विनंती सध्या मुंबई पोलीस करत आहे.